अॅलर्जी allergy



अॅलर्जी
म्हणजे शरीराला एखादी गोष्ट न मानवणे, सात्म्य न होणे,
शरीराने न स्वीकारणे.

काँग्रेस गवत, निरनिराळी वेदनाशामक औषधे, टोमॅटो,मिरची, लसूण, दही, ओवा यासारखे खाद्यपदार्थ, उदबत्त्या, टायर, फटाके यांचे वास अशा नाना गोष्टींचा मानवी शरीराला त्रास होऊ शकतो. कोणाच्या उघड्या अंगावर, चेह-यावर, हातावर, छातीवर पुरळ उठतो; कोणाला दम्याचा त्रास होतो; कोणाच्या अंगाला विलक्षण खाज सुटते; कोणाला सर्दी पडसे होते; कोणाचे पोट दुखते.
आयुर्वेद याचा सम्यक विचार करतो, कारणाकडे त्याच्या गुणधर्माकडे बघितले तर परिणामावर इलाज सापडतो. काही थोड्या अॅलर्जी प्रकारांचा या ब्लॉग मध्ये विचार केलेला आहे.


कारणे:

१) शरीराची रोगप्रतिकारक शक्ति कमी पडणे.

२) काँग्रेस गवत, निरनिराळी पेट्रोल, डिझेल वा मशीनचे वापराची
तेले, पेनबामचा फाजील वापर.

३) उग्र वासाच्या उदबत्त्यांचा धूर; जळणाच्या टायरचा वास,
फटाक्याचे विषारी धूर इ.
४) अॅस्पिरीन, पेनिसिलीन, स्टेरॉईडस्, निरनिराळी व्हिटॅमिन्स, शरीराला
नको असताना दिली जाणे.

५) ऋतुमानाप्रमाणे हवामान नसणे, गार पाणी.
६) टोमॅटो, आंबा, लसूण, मिरची, दही, दूध, आले, मीठ, लोणचे,
मांसाहार, अंडी यारखे आहारातील पदार्थ.
७) बिब्बा, सुंठ, गुग्गुळ, दूर्वा, धने, एरंडेल, मोहरीचे तेल, रुईची
पाने, जमालगोटा, लोहभस्म, नागभस्म, बचनाग, इत्यादि औषधी
पदार्थ.
८) काहीजणांना नायलॉन, टेरेलिन, रबर, प्लॅस्टीक या कृत्रिम
पदार्थापासून बनलेले कपडे वा पादत्राणे वापरल्यामुळे अॅलर्जीचा
प्रादुर्भाव होतो.


लक्षणे:

१) चेहरा, हाताचा व छातीचा उघडा भाग यावर पुरळ येणे, तसेच
कायम रहाणे, खाज सुटणे, घाण हवेत ते वाढणे, डाग काळे
पडणे, चेहरा विद्रुप दिसणे.
२) सकाळी सर्दी, शिंका सुरू होणे.

३) रात्रौ किंवा अवेळी दम्याचे, श्वासाचे, खोकल्याचे वेग सुरू होणे.
४) लघवीला जळजळ, अडथळा, प्रमाण कमी होणे इत्यादि तक्रारी.

५) घशामध्ये अस्वस्थ वाटते. नाकातोंडातून स्त्राव सुरू होणे, डोके
जड होणे, बराच वेळ खाकरावेसे वाटणे.

६) सर्वांगाला विलक्षण कंड सुटणे, पुरळ येणे, चट्टे पडणे, लस वाहणे,
पुवाचे फोड होणे, डोळे, त्वचा, लघवीच्या जागी विशेषतः आग
होणे, सर्वांगाचा दाह होणे,

७) हातापायाच्या बोटांचे सांध्यातील हाडावर आघात होऊन
वाकडेपणा येणे,


पथ्यापथ्य:

१) अळणी जेवण म्हणजेच मीठ, तिखट व आंबट पदार्थ नसलेला
आहार असावा,
२) निव्वळ गाईच्या किंवा शेळीच्या दूधावर रहाता आले तर अधिक चांगले.

३) लोणचे, पापडे, मासे, दही असे शरीरात स्राव निर्माण करणारे
अभिष्यंदी पदार्थ कटाक्षाने टाळावेत.

४) दूध, भोपळा, कारले, पडवळ, दोडका, चाकवत, राजगिरा,
शेवगा, सुरण, मूग, गोड ताक, नारळाचे पाणी, कोथिंबीर, फुलका चपाती, ज्वारीची भाकरी हे पदार्थ पथ्यकर आहेत.

५) दिवसा झोप, रात्री जागरण, अनियमितवेळी जेवण, राग करणे,
दारु, सिगारेट तंबाखू इ. व्यसने कटाक्षाने टाळावीत. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक यांचा वापर करू नये,

६) नेहमी पोट साफ राहील याची दक्षता घ्यावी.
७) सर्दी साठावयास संधि देऊ नये.
८) साबण, सोडा टाळावा.
९) कृत्रिम धाग्याचे कपडे, प्लॅस्टिक पादत्राणे वापरू नयेत.

धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

अम्लपित्त Acidity

डोळ्यांचे विकार

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )